चिकन पट्टी सामोसा / chicken patti samosa



साहित्य-
१. चिकन खिमा अर्धा पाव
२. मैदा दीड वाटी
३. मीठ आवश्यकतेनुसार
४. तिखट चवीनुसार
५. तेल आवश्यकतेनुसार
६. गरम मसाला पाव चमचा
७. कांदे २
८. पाणी आवश्यकतेनुसार
९. आले लसूण पेस्ट १ चमचा
१०. मोहरी पाव चमचा
११. जिरे पाव चमचा
१२. कोथिंबीर पाव वाटी
कृती-
मैद्यात १ चमचा मीठ टाकून पाण्याने घट्ट भिजवून घ्यावे. १ तास झाकून मुरु द्यावे. एका भांड्यात २ चमचे तेल घेऊन त्यात मोहरी व जिरे तडतडू द्यावे. त्यात कांदा परतवून घ्यावा. आता आले लसूण पेस्ट टाकून १ मिनिट होऊ द्यावे. गरम मसाला, तिखट टाकावे. व खिमा टाकून ५ मिनिटे शिजू द्यावे. आता मीठ टाकून मिश्रण ढवळून त्यातील सर्व पाणी आटू द्यावे. मिश्रण पूर्ण कोरडे झाल्यावर gas बंद करून कोथिंबीर चिरून टाकावी. हे मिश्रण बाजूला ठेऊन द्यावे. आता मैद्याच्या गोळ्याचे लिंबा एवढे गोळे करावे. त्यातील २ गोळ्यांच्या पुऱ्या लाटाव्या. त्यांना वरील बाजूने तेल लावून दोन्ही पुर्यांवर मैदा भुरभुरावा. आता दोन्ही पुर्या तेलाच्या बाजूने एकमेकांवर ठेवून त्याची शक्य तितकी पातळ पोळी लाटावी. आता तवा तापवून त्यावर ही पोळी टाकावी. अर्ध्या मिनिटातच पोळीच्या काठाने पापुद्रा सुटताना दिसेल. असे दिसल्यास लगेच पोळी तव्यावरून काढून घ्यावी. व लगेच तो पापुद्रा पोळीपासून अलगद तुटू न देता काढावा. आता ह्याच्या २ पोळ्या झाल्या. ह्यातील एक पोळी घेऊन त्याला उभे ३ भागात कापावे. अश्याप्रकारे सर्व पट्या तयार करून घ्याव्या. एक पट्टी घेऊन त्याला त्रिकोणी फोल्ड करून त्यात वरील मिश्रण भरावे. परत त्रिकोणी फोल्ड करत करत पूर्ण पट्टी गुंडाळावी. एका वाटीत २ चमचे पाणी व १ चमचा मैदा घेऊन त्याची पेस्ट करून ही पेस्ट सामोस्याच्या काठांना लावून समोसा चिटकवून घ्यावा. कुठेही छिद्र राहू देऊ नये. अश्याप्रकारे सर्व समोसे तयार करून गरम तेलात तळून घ्यावे. गरम गरम खाण्यास द्यावे.
टीप-
पट्ट्या तयार करून प्लास्टिक च्या पिशवीत फ्रीज मध्ये ठेवल्यास जवळपास आठवडाभर टिकतात.   

Comments