पुणेरी मिसळ / puneri misal



साहित्य-
१. मोड आलेली मटकी २ वाट्या
२. बटाटा १
३. आले लसूण पेस्ट १ चमचा  
४. जाडे पोहे भिजवलेले १ वाटी
५. तेल आवश्यकतेनुसार
६. मोहरी अर्धा चमचा
७. जिरे अर्धा चमचा
८. लिंबू १
९. कांदे ३  
१०. tomato १
११. तयार फरसाण १ वाटी
१२. सुक्या खोबऱ्याचा कीस पाव वाटी
१३. तिखट चवीनुसार
१४. मीठ चवीनुसार
१५. गरम मसाला पाव चमचा
१६. कोथिंबीर अर्धी वाटी
१७. हळद पाव चमचा
१८. पाणी आवश्यकतेनुसार
कृती-
प्रथम पोहे बनवण्यासाठी एका कढईत २ चमचे तेल घेऊन त्यात पाव चमचा मोहरी व जिरे तडतडू द्यावे. थोडी हळद टाकावी. पोहे व मीठ घालून ढवळून २ मिनिटाने gas बंद करून खाली उतरवून घ्यावे.
मटकीची उसळ बनवण्यासाठी एका भांड्यात मटकी व ६ कप पाणी घेऊन १० मिनिटे उकळावे. मटकी दाबून पहावी. शिजली असल्यास मग त्याचे पाणी काढून बाजूला ठेवावे. एका पातेल्यात ३ चमचे तेल घेऊन त्यात पाव चमचा मोहरी व जिरे तडतडू द्यावे. मग १ कांदा बारीक चिरून टाकावा. कांदा शिजल्यावर थोडीशी हळद, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट टाकून थोडेसे परतावे. आता tomato टाकून तिखट टाकावे. २ मिनिटे परतावे. मोड आलेली मटकी, मीठ टाकून त्यात उकडलेला बटाटा अर्धवट कुस्करून टाकावा. उसळ पूर्ण कोरडी होऊ द्यावी. 
कट (तिखट रस्सा) बनवण्यासाठी प्रथम एक कांदा चिरून घ्यावा. तव्यावर अर्धा चमचा तेल टाकून त्यावर खरपूस परतावा. त्याच तव्यावर खोबऱ्याचा कीस भाजून घ्यावा. खोबरे व कांदा एकत्र करून मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकून वाटून घ्यावे. आता एका भांड्यात ७-८ चमचे तेल घ्यावे. त्यात वाटलेले मिश्रण, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट, तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला टाकून बारीक gas वर ५ मिनिटे परतत राहावे. मग त्यात मटकी शिजवलेले पाणी टाकून कट पातळ करून घ्यावा. हवे असल्यास अजून पाणी टाकून पातळ करावे.
सर्व्ह करताना एका बाऊल मध्ये प्रथम पोहे, त्यावर उसळ, मग कट, बारीक चिरलेला कांदा, फरसाण, व कोथिंबीर असे सर्व्ह करतात. हवे असल्यास कट अजून एका बाऊल मध्ये बाजूला द्यावा. सोबत पाव (ब्रेड) व लिंबू चिरून द्यावे.

Comments