कोंबडी वडे / chicken vada




साहित्य-
१. चिकन अर्धा किलो
२. कांदे ४  
३. कोरडे खोबरे २ इंच
४. तिखट चवीनुसार
५. मीठ चवीनुसार
६. गरम मसाला १ चमचा
७. कोथिंबीर पाव वाटी
८. तेल आवश्यकतेनुसार
९. लसूण-आले पेस्ट १ चमचा
१०. दही २ चमचे
११. हळद १ चमचा
१२. पाणी आवश्यकतेनुसार
१३. हरबरा डाळ पाव किलो
१४. उडीद डाळ पाव किलो
१५. तांदूळ सव्वा किलो
१६. धने ५ चमचे
१७. बडीशेप ४ चमचे
१८. मिरे ८
१९. लवंग ५
२०. जिरे ४ चमचे
२१. गुळाचे पाणी १ चमचा
२२. गव्हाचे पीठ पाऊण वाटी 
कृती-
हरबरा डाळ व उडीद डाळ किंचित भाजून घेणे. आता धने, बडीशेप, मिरे, लवंग, जिरे एक एक करून चांगले भाजून घेऊन डाळींमध्ये टाकणे. त्यात तांदूळ टाकून चांगले एकत्र करून जाडसर दळून आणणे. वडे करतेवेळी ३ वाटी दळलेले पीठ व कणिक परातीत एकत्र करणे. त्यात २ कांदे किसून टाकणे, अर्धा चमचा हळद, मीठ, गुळाचे पाणी एकत्र करून कोमट पाण्याने गोळा भिजवणे. अर्धा तास झाकून मुरु देणे.
       भाजी करिता चिकन धून त्याला दही, पाव चमचा हळद व मीठ लावून १५ मिनिटे मुरत ठेवणे. २ कांदे व खोबरे बारीक चिरून तव्यावर अर्धा चमचा तेल टाकून लालसर भाजून घेणे. आता मिक्सर मध्ये लसूण-आले पेस्ट व कांदा, खोबऱ्याची एकत्र बारीक पेस्ट करून घेणे. एका पातेल्यात अर्धी वाटी तेल गरम करून त्यात तयार केलेली पेस्ट टाकणे. आता पाव चमचा हळद, तिखट, गरम मसाला टाकून चिकन टाकणे. २ मिनिटाने आवश्यकतेनुसार पाणी टाकून, मीठ टाकणे व शिजू देणे. भाजी शिजली की वरून कोथिंबीर टाकणे.
       वडे तळण्याकरिता एका कढईत तेल गरम करत ठेवणे. २ प्लास्टिकचे तुकडे घेणे. एक तुकडा पोळपाटावर ठेवणे. त्याला तेल लावणे. दुसऱ्या प्लास्टिकच्या तुकड्यालाही एका बाजूने तेल लावणे. आता तयार पिठाचा पेढा एवढा गोळा घेऊन पोळपाटावर ठेवावा. त्यावर दुसरा प्लास्टिकचा तुकडा ठेवावा. आता पुरी लाटुन घेऊन दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्यावी. अश्या प्रकारे सर्व वडे तळून घ्यावे. गरज असल्यास मधून मधून प्लास्टिकला तेल लावत राहावे. कोंबडी वडे गरम गरम सर्व्ह करावे.     

Comments