फ्रेश पनीर स्टफ मोड आलेल्या मुगाचा कुरकुरीत हेल्दी डोसा ( crispy sprouted green gram dosa with fresh paneer stuffing)

साहित्य - 

१. मोड आलेले मूग २ वाटी 

२. रवा पाव वाटी

३. तांदुळाचे पीठ पाव वाटी

४. मीठ चवीनुसार

५. मिरच्या ४

६. आल्याचा एक छोटा तुकडा 

७. कोथिंबीर एक वाटी

८. पनीर १०० ग्रॅम

९. पतीचा कांदा २

 १०. चाट मसाला एक चमचा

११. कांदा १

१२. तेल आवश्यकतेनुसार


कृती - 

मोड आलेले मूग, आले, मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्यावी. आता एका भांड्यात काढून त्यात तांदूळ पीठ, रवा, मीठ टाकून मिश्रण दोस्यांसारखे पातळ करून घ्यावे. आता गॅस सुरू करून त्यावर नॉनस्टिक पॅन ठेवावा. थोडासा गरम झाला की एक चमचा तेल सगळीकडे पसरवून त्यावर डोसाचे पीठ पातळ पसरवावे. आणि गॅस मोठा करावा. (डोसा पसरवतांना तवा जास्त गरम असता कामा नये. गरम असल्यास डोसे जमत नाहीत) एक डोसा झाल्यावर काढून घ्यावा. गॅस बंद करून अर्ध्या मिनीटांनी दुसरा डोसा करावा. आता स्टफिंग करण्यासाठी फ्रेश पनीर कुस्करून घ्यावे. त्यात चाट मसाला टाकावा. डोस्यावर पनीर, चिरलेला पतीचा कांदा, उरलेली कोथिंबीर, कांदा पसरवून गरमागरम कांद्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे. 

Comments