इन्स्टंट ज्वारीच्या पिठाचा दोसा ( instant jowar dosa)

साहित्य - 

१. ज्वारीचे पीठ २ वाटी

२. तेल आवश्यकतेनुसार

३. मीठ चवीनुसार

४. जिरे १ चमचा

५. मिरच्या ५-६ 

६. कोथिंबीर पाव वाटी

७. कांदा १ 


कृती - 

एका भांड्यात ज्वारीचे पीठ घ्यावे. त्यात कांदा एकदम बारीक चिरून घालावा. मिरचीची पेस्ट करून टाकावी. चिरलेली कोथिंबीर, मीठ, जिरे व एक चमचा तेल घालून पाणी टाकावे. हे मिश्रण भरपूर पातळ करावे. (मिश्रण घट्ट राहिल्यास डोस्यांना जाळी पडणार नाही आणि डोसे कुरकुरीत होणार नाही) यातील सर्व गुठळ्या मोडून मिश्रण छान एकत्र करावे. आता एक नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर अर्धा चमचा तेल नीट पसरवून घ्यावे. आता त्यावर थोडे पाणी शिंपडावे. डोस्याचे मिश्रण एका पळीने तव्यावर आधी बाहेरील बाजूने गोलाकार टाकावे. मग आतील बाजूने टाकावे. डोस्याला छान जाळी पडू द्यावी. मिश्रण एकावर एक टाकू नये. खालच्या बाजूने खरपूस भाजल्यावर डोसा पलटवून घ्यावा. दोन्ही बाजूनी भाजून गरमागरम खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावा. 

Comments