ओल्या तुरीच्या दाण्यांची खस्ता कचोरी ( green toor daal kachori)

साहित्य -

१. तुरीच्या शेंगांचे ओले हिरवे दाणे २ वाटी

२. मैदा ३ वाटी

३. अर्धी वाटी बेसन 

४. मीठ चवीनुसार

५. तिखट आवडीनुसार

६. जिरेपूड १ चमचा 

 ७. धणेपूड १ चमचा 

८. हिरव्या मिरच्या ५

९. आले एक तुकडा

१०. लसूण पाकळ्या ५-६ 

११. शोप १ चमचा 

१२. तेल आवश्यकतेनुसार 

१३. ओवा १ चमचा 

१४. हळद अर्धा चमचा 


कृती - 

प्रथम मैद्यामध्ये मीठ, ओवा टाकून एकत्र करणे. मग त्यात ५ चमचे कडकडीत तेलाचे मोहन टाकून एकत्र करावे. थंड पाण्याने गोळा सैलसर भिजवून अर्धा तास मुरण्यास ठेवणे. एका भांड्यात ४ चमचे तेल तापवून घेणे. त्यात मिरची, आले, लसूण यांची पेस्ट करून टाकणे. थोडी परतून घेणे. तुरीच्या दाण्यांची पेस्ट करून ह्यात टाकणे. ५ मिनिटे मंद गॅस वर परतणे. आता बेसन, हळद, तिखट, धणेपूड, जिरेपूड, मीठ, शोप टाकून मंद गॅसवर चांगले परतून घेणे. बेसन लालसर झाले की थोडा पाण्याचा हबका मारावा व गॅस बंद करावा. मिश्रण थंड होऊ द्यावे. आता पोळीच्या गोळ्यापेक्षा थोडा छोटा गोळा घेऊन हातावर त्याची वाटी करून त्यात मिश्रण भरावे. गोळा चारही बाजूनी वरती आणत बंद करावा. आता किंचित मैदा लावून पोळपाटावर जाड लाटावे. तेल कढईत तापत ठेवावे. तापल्यावर गॅस मंद करून एक कचोरी सोडावी. कचोरीला वरच्या बाजूने थोडासा दाब देत जावा. हळूहळू ती फुगत आल्यावर पलटावी. गॅस मंदच ठेवून दोन्ही बाजूनी खरपूस लाल होईपर्यंत तळावी. गरमागरम कचोरी दही, कांदा, बारीक शेव, कोथिंबीर टाकून सर्व्ह करावी. 

Comments