गव्हाच्या पिठाचे चिकन तंदुरी मोमोज ( whole wheat chicken tandoori momos




साहित्य - 

१. चिकन खिमा एक पाव 

२. गव्हाचे पीठ दीड वाटी

३. मीठ चवीनुसार

४. कांद्याची पात अर्धी वाटी

५. कांदा एक

६. मिरच्या २ 

७. मिरपूड एक चमचा

८. सोया सॉस एक चमचा

९. तेल आवश्यकतेनुसार

१०. कोथिंबीर पाव वाटी

११. दही एक वाटी

१२. तंदूर मसाला 

१३. आले लसूण पेस्ट २ चमचे 

१४. बेसन २ चमचे

१५. केशरी रंग (वगळला तरी चालेल)

१६. चाट मसाला अर्धा चमचा


कृती - 

गव्हाच्या पिठात चवीनुसार मीठ टाकून पाण्याने घट्ट भिजवून गोळा झाकून अर्धा तास मुरण्यास ठेवावा. खिमा एका भांड्यात घेऊन त्यात कांद्याची पात, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरच्या, आले लसूण पेस्ट, सॉस, तेल, मीठ, मिरपूड टाकून नीट एकत्र करावे. आता पिठाचे लिंबाएवढे छोटे गोळे करून पारी लाटून घ्यावी. त्यात चिकनचे एक चमचा मिश्रण मधोमध ठेऊन पारीला एका बाजूने प्लेन व एका बाजूने छोटे छोटे मोड देऊन मोमोजचा आकार द्यावा. दोन्ही बाजू दाबून जोडून घ्याव्या. असे सर्व मोमोज बनवून घ्यावे. सर्व मोमोज गरम तेलात दोन्ही बाजूंनी तळून घ्यावे. एका भांड्यात दही, तंदूर मसाला, मीठ, एक चमचा आले लसूण पेस्ट, केशरी रंग, चाट मसाला, बेसन कालवून घ्यावे. ह्या मिश्रणात सर्व मोमोज टाकून अलगद हलवून सर्व मोमोज ना मिश्रण नीट लावून घ्यावे. एका नॉनस्टिक पॅनमध्ये हे मोमोज ठेवून मंद आचेवर ५-५ मिनिटे दोन्ही बाजूंनी भाजावे. जेणेकरून मोमोज थोडे कोरडे होतील. आता ३ -४ मोमोज एका लाकडाच्या काडीला खोचून गॅसच्या आचेवर धरून नीट सर्व बाजूंनी थोडे काळे डाग येईपर्यंत भाजून घ्यावे. गरम गरम मोमोज पुदिना चटणी आणि कांद्या बरोबर सर्व्ह करावे. 

Comments