हेल्दी वाटाण्याची गोटा कचोरी ( green peas healthy gota kachori )




साहित्य-

१. ओले वाटाणे २ वाटी
२. गव्हाचे पीठ ४ वाट्या
३. तेल आवश्यकतेनुसार
४. ओवा अर्धा चमचा
५. सोडा पाव चमचा
६. धने पूड एक चमचा
७. आमचूर पावडर अर्धा चमचा
८. मीठ चवीनुसार
९. बडिशेप एक चमचा
१०. कांदे २
११. मिरच्या ३-४
१२. हळद पाव चमचा
१३. आले एक छोटा तुकडा
१४. लसूण पाकळ्या ५-६
१५. गरम मसाला एक चमचा
१६. मोहरी अर्धा चमचा
१७. जिरे अर्धा चमचा

कृती -

वाटाणे मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात २ चमचे तेल तापवून त्यात मोहरी, जिरे तडतडू द्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून थोडा परतल्यावर आले, लसूण व मिरच्या बारीक वाटून त्याची पेस्ट टाकावी. हे सर्व नीट परतले की हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, धणेपूड, बडिशेप टाकून १ मिनिट परतावे. मग वाटलेले वाटाणे टाकून मंद गॅस वर ७-८ मिनिटे झाकण ठेऊन शिजू द्यावे. आता गॅस बंद करून कोथिंबीर बारीक चिरून टाकावी व मिश्रण थंड होऊ द्यावे. आता कणकेत मीठ, ओवा, सोडा व ३ चमचे तेल टाकून एकत्र करावे. व पाण्याने कणीक घट्ट मळून घ्यावी. सैल करू नये. आता कणकेचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची हातानेच वाटी करून त्यात एक चमचा वाटण्याचे मिश्रण भरून गोळा बंद करावा. गोल आकार देऊन अप्पे पात्रात २-३ थेंब तेल टाकून सर्व गोळे ठेवावे. वरून झाकण ठेऊन गॅस पूर्णपणे मंद करावा. ३-४ मिनिटांनी पहावे. कचोरी खालून ब्राऊन झाली की पलटावे. असे करून सर्व कचोरी छान सगळीकडून खरपूस भाजून घ्यावी. गरम गरम सॉस बरोबर सर्व्ह करावे.

Comments