श्रीखंड वडी ( shrikhand vadi / barfi )




साहित्य - 

१. घट्ट दही एक लिटर 
२. साखर पाऊण वाटी
३. पिठीसाखर पाऊण वाटी
४. वेलची पूड अर्धा चमचा
५. तूप एक चमचा
६. केशरी किंवा पिवळा रंग २-३ थेंब 
७. केशर ८-१० काड्या

कृती - 

एका पातळ कपड्यात दही ओतून कापड दोरीने वरून बांधून घ्यावे. थोडे पिळून पाणी काढून टाकावे. हे कापड वरती लटकवून खाली भांडे ठेवावे. जेणेकरून कापडातून हळू हळू पाणी भांड्यात जमा होईल. २ तासाने कापड सोडावे. भांड्यातील पाणी फेकून द्यावे. दह्याचा चक्का तयार झालेला दिसेल. आता एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये चक्का, साखर टाकून शिजू द्यावे. साखर विरघळून पाणी होईल. जवळपास १५ मिनिटे परतत राहावे. त्यात वेलचीपूड, रंग, केशर टाकून मिश्रणाचा गोळा होईपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्यावे. एका ताटाला तूप पसरवून लावून घ्यावे. एका भांड्यात गोळा झालेले मिश्रण काढून त्यात पिठीसाखर टाकावी. थोडी थोडी टाकत कालवत जावे. गोळा थोडा कोरडा होईल. तेव्हा तो तूप लावलेल्या ताटामध्ये पसरवावा. व थापून घ्यावा. आता त्याच्या हव्या त्या आकारात चाकूने वड्या पाडाव्या. वरून केशर सजवावे. 

टीप - 

दह्यात साखर घालताना आपल्याला जास्त गोड आवडत असल्यास साखर थोडी जास्त घालावी. आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकतो.

Comments