चॉकलेट इकलेयर विथ मिल्क फिलिंग ( chocolate eclair with milk filling )



साहित्य -

१. मैदा १ वाटी
२. बटर अर्धी वाटी
३. अंडी ३
४. व्हीपिंग क्रीम एक वाटी
५. व्हॅनिला इसेन्स ३-४ थेंब
६. दूध पावडर अर्धी वाटी
७. कुकिंग चॉकलेट किसलेले अर्धी वाटी 
८. स्प्रिंकल सजवण्याकरिता
९. दूध ४ चमचे 

कृती -

एका नॉनस्टिक पॅनमध्ये एक कप पाणी व बटर एकत्र गरम करायला ठेवावे. बटर विरघळून पाणी उकळायला लागले की गॅस बंद करावा. सर्व मैदा टाकून नीट कालवून परत गॅस वर ठेवावे. मंद गॅसवर २ मिनिटे शिजवून गॅस बंद करावा. थंड झाल्यावर एक अंड फोडून मिश्रणात टाकून चांगले एकजीव कालवून घ्यावे. आता दुसरे अंडे टाकून चांगले एकजीव करावे. परत तिसरे अंडे टाकून नीट एकत्र करून घ्यावे. आता हे मिश्रण एका पायपींग बॅग मधे भरावे. त्याला गोल तोंडाचे नोझल लावावे. एका अल्युमिनियम भांड्यावर बटर पेपर ठेऊन त्यावर पायपिंग बॅग ने १५ सेंटिमीटर च्या जवळपास उभी लाईन चा आकार काढावा. एकावर एक लाईन काढावी. जेणेकरून इकलेयर जाड होतील.  आता ३ सेंटिमीटर चे अंतर ठेऊन अजून एक लाईन काढावी. असे सर्व इकलेयर्स काढून घ्यावे. बोटाला पाणी लावून त्याचे वर आलेले टोक थोडे दाबून नीट आकार द्यावा. सगळ्या इकलेयरला वरून फोडलेल्या अंड्याने ब्रश करावे. जेणेकरून इकलेयर ला वरून कलर येईल. आता प्रीहिटेड ओव्हन मध्ये हाय टेंपरेचर वर २० ते ३० मिनिटे ठेवावे. वरून ब्राऊन कलर झाला की काढून घ्यावे. आता थंड होऊ द्यावे. एका भांड्यात थंडगार असलेले व्हिपिंग क्रीम बिटरने बीट करून त्यात व्हॅनिला इसेन्स, मिल्क पावडर टाकून एकत्र करावे. आता थंड झालेल्या इकलेयर्स ला एका टोकापासून आतमध्ये थोडे छिद्र पाडावे. ईकलेयर्स आतून पोकळ झालेले असतील. आता एक बारीक छिद्र असलेले नोझल पायपिंग बॅगमध्ये टाकून त्यात क्रीम चे मिश्रण टाकावे. हे मिश्रण ईकलेयर्स मधे भरावे. एका काचेच्या भांड्यात चॉकलेट व दूध घेऊन ते डबल बॉयलर वर किंवा ओव्हन मध्ये वितळवून घ्यावे. हे मिश्रण इकलेयर ला वरून लावावे. व वरून स्प्रिंकल्स टाकून सजवावे. 

Comments