गव्हाच्या पिठाचे लादी पाव ( whole wheat paav bread )




साहित्य - 

१. गव्हाचे पीठ ३ वाटी 
२. मैदा अर्धी वाटी ( वगळले तरी चालेल )
३. यीस्ट दीड चमचा
४. साखर २ चमचे
५. मीठ एक चमचा
६. बटर आवश्यकतेनुसार
७. दूध ३ चमचे 
८. पांढरे तीळ सजवण्याकरीता
९. तेल एक चमचा

कृती - 
 
एका कप मधे कोमट पाणी घ्यावे. त्यात एक चमचा साखर विरघळून घ्यावी. त्यात यीस्ट टाकून एकत्र करून ५ मिनिटे झाकून ठेवावे. (५ मिनिटानंतर जर यीस्ट फुगले असेल तरच वापरायचे आहे. अन्यथा वापरू नये. ब्रेड फुगणार नाही.) एका परातीत गव्हाचे पीठ, मैदा बारीक चाळणीने चाळून घ्यावे. मीठ टाकून एकत्र करावे. आता यिस्टचे पाणी टाकून नीट एकत्र करावे. आता आवश्यकतेनुसार पाणी घेत जावे. व कणीक १० मिनिटे चांगली मळत राहावी. पोळीच्या गोळ्यापेक्षा सैल करावी. चांगली मळून झाल्यावर एक चमचा बटर टाकून अजून २ मिनिटे मळावी. आता त्यावर तेल सगळीकडे लावून एक तास झाकून ठेवावे. एक तासाने कणीक चांगली फुगली असेल. आता परत २ मिनिटे मळून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवावे. कणीक हाताला चिकटत असेल तर हाताला थोडे बटर लावावे. ज्या पात्रात पाव करायचे असतील त्या पात्राला आतून चांगले बटर लावून ग्रीस करून त्यात हे गोळे एक एक सेंटीमटरच्या अंतरावर ठेवावे. एका वाटीत दूध घेऊन त्यात एक चमचा साखर मिक्स करून घ्यावी. हे दूध ब्रश च्या साहाय्याने गोळ्यांना वरून लावावे. आता हे पात्र परत एक तास झाकून ठेवावे. एक तासाने कणीक चांगली फुलली असेल. परत वरून दूध ब्रश करून त्यावर तीळ टाकावे. प्रीहिटेड ओव्हन मध्ये १८० वर २० मिनिटे बेक करावे. ओव्हन नसल्यास कूकर किंवा मोठे पातेले घेऊन त्यात एक स्टँड ठेवावे. व झाकण ठेवून ५ मिनिटे गरम होऊ द्यावे. नंतर स्टँड वर पावचे पात्र ठेऊन झाकण ठेवून १५ - २० मिनिटे मध्यम आचेवर बेक करावे. ( कूकर मधे करत असल्यास कुकरची रिंग व शिट्टी लावू नये) बेक झाल्यावर  पावला वरून बटर लावून एका ओल्या कापडाने अर्धा तास झाकून ठेवावे. त्याने पाव नरम राहतात.

Comments