वाफवलेला चॉकलेट केक आणि बटरक्रिम फ्रॉस्टिंग (steamed chocolate cake with buttercream frosting)



साहित्य - 

१. दही पाऊण वाटी 
२. पिठीसाखर सव्वा वाटी
३. व्हॅनिला इसेन्स २ चमचे 
४. मीठ पाव चमचा
५. बेकिंग पावडर १ चमचा 
६. बेकिंग सोडा १ चमचा
७. मैदा दीड वाटी 
८. तेल पाव वाटी 
९. हेवी क्रिम पाव वाटी
१०. कोको पावडर १ वाटी 
११. बटर १०० ग्रॅम 
१२. दूध आवश्यकतेनुसार

कृती - 
प्रथम केक करता एका भांड्यात दही, पाऊण वाटी पिठीसाखर, एक चमचा व्हॅनिला इसेन्स फेटून घेणे. साखर विरघळल्यावर तेल टाकून एकत्र करणे. आता चाळणीत मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ व अर्धी वाटी कोको पावडर चाळून मिश्रणात टाकणे. आता अलगद एकत्र करावे. मिश्रण ढोकळ्याच्या पीठा इतके पातळ करणे. आवश्यकतेनुसार दूध टाकणे. एका अल्युमिनियमच्या भांड्याला तेल लावून त्यात हे मिश्रण ओतून घेणे. भांड्याला वरून अल्युमिनियम फॉईलने नीट झाकणे. आता हे भांडे स्टीमर मध्ये १ तासाकरता ठेवून केक शिजू देणे. 
             फ्रॉस्टिंग करता एका भांड्यात बटर बिटर ने चांगले फेटून घेणे. त्यात उरलेली अर्धी वाटी पिठीसाखर, एक चमचा व्हॅनिला इसेन्स, अर्धी वाटी कोको पावडर व हेवी क्रिम टाकून परत चांगले फेटणे. हे फ्रॉस्टिंग फ्रीजमध्ये ठेवून देणे. केक शिजल्यावर पूर्णपणे थंड झाल्यावर त्याला हे फ्रॉस्टिंग व्यवस्थित सगळीकडे लावून वरून हवे तसे सजवणे. केक फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून मग सर्व्ह करावा. 

Comments