स्पीनच राविओली विथ चिकन सॉस / spinach ravioli with chicken sauce




साहित्य-

१. एक पाव पालक
२. मोझेरेला चीज १ वाटी किसलेले
३. मिरपूड अर्धा चमचा
४. ऑलिव्ह ऑईल ६ चमचे
५. अंडी २
६. मैदा २ वाटी
७. मीठ चवीनुसार
८. टमाटा १
९. कांदा १
१०. चिली फ्लेक्स २ चमचे
११. ऑरीगानो अर्धा चमचा
१२. चिकन खिमा दीड वाटी
१३. टमाटा प्युरी १ वाटी 

कृती-

खिमा धूवून घ्यावा. एका पातेल्यात ३ चमचे तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा परतावा. व चिरलेला टमाटा टाकून शिजू द्यावे. मग खीमा टाकून चिली फ्लेक्स, मीठ, टमाटा प्युरी टाकून ५ मिनिटे शिजू द्यावे. आवश्यकता वाटल्यास पाणी टाकावे. थोडे पातळ राहू द्यावे. gas बंद करावा. परातीत मैदा घेऊन त्यात मीठ व १ चमचा तेल टाकून कालवून घ्यावे. अंडी फोडून थोडे फेटून घ्यावे. आता थोडे थोडे मैद्यात मिक्स करत जावे. गोळा बनवावा. व अर्धा तास झाकून ठेवावा. एका भांड्यात १ लिटर पाणी उकळावे. त्यात धुतलेला पालक टाकावा. ५ मिनिटे शिजवून पूर्ण पाणी काढून टाकावे. थंड झाल्यावर बारीक चिरून घ्यावा. त्यात चीज, ऑरीगानो, मिरपूड, मीठ टाकून कालवावे. 
       भिजवलेल्या मैद्याचा छोटा गोळा घेऊन पातळ लाटून पोळी करावी. लाटतांना चिकटू नये म्हणून सारखा मैदा लावत राहावा. आता चाकूने त्याला ३ उभ्या चिरा माराव्या जेणेकरून पोळीचे ४ उभे तुकडे होतील. आता एका तुकड्यावर २-२ सेंटीमीटर वर अर्धा चमचा पालकाचे मिश्रण ठेवावे. मिश्रणाच्या चारही बाजूला पाणी लावावे. ह्या तुकड्यावर दुसरा तुकडा ठेवावा. सर्व ठेवलेले मिश्रण झाकले गेले पाहिजे. दाबून दोन्ही तुकडे चांगले चिकटवून घ्यावे. आता प्रत्येक मिश्रणाची एक राविओली होईल याप्रमाणे त्याचे चाकूने चौकोनी तुकडे कापावे. एका ताटात थोडा मैदा पसरवून सर्व राविओली तयार करून त्यावर ठेवावी. एका मोठ्या कढईत अर्धी कढई पाणी उकळावे. त्यात २ चमचे तेल टाकून त्यात सर्व राविओली टाकून शिजू द्यावी. १० मिनिटांनी दाबून पहावी. शिजली असल्यास काढून घ्यावी. एका सर्व्हिंग प्लेट मध्ये राविओली पसरवून त्यावर चिकन सॉस टाकून गरम सर्व्ह करावे. 

Comments