चिकन दम बिर्यानी / chicken dum biryani






 


साहित्य-

१. चिकनचे मोठे पिसेस १ किलो
२. बासमती बिर्यानी तांदूळ साडे ३ वाटी
३. पुदिन्याची पाने अर्धी वाटी
४. कोथिंबीर १ वाटी
५. दही दीड वाटी
६. तिखट अडीच चमचे
७. गरम मसाला २ चमचे
८. बिर्यानी मसाला २ चमचे
९. तमालपत्र २
१०. मोठी वेलची १
११. कांदे ५ मोठे
१२. हळद अर्धा चमचा
१३. केशर २ चिमुट
१४. दुध ५ चमचे
१५. गुलाब पाणी ५ चमचे
१६. मीठ चवीनुसार
१७. आले लसूण पेस्ट २ चमचे
१८. साजूक तूप ४ चमचे
१९. तेल आवश्यकतेनुसार
२०. खाण्याचा लाल रंग चिमुटभर
२१. कोळसा १
२२. २ वाटी कणकेचा गोळा 

कृती-

आदल्या रात्री चिकन धूवून त्यात दही, हळद, तिखट, गरम मसाला, बिर्यानी मसाला, आले लसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर व पुदिना चिरून टाकावा. चांगले एकत्र करून फ्रीज मध्ये झाकून रात्रभर मुरण्यास ठेवावे. सकाळी तांदूळ धुवून पाण्यात १ तास भिजत ठेवावे. कांदे पातळ उभे चिरून तेलात ब्राऊन तळून घ्यावे. एका मोठ्या भांड्यात १० वाटी पाणी उकळवावे. त्यात २ चमचे तेल, तमालपत्र, मोठी वेलची व मीठ टाकून तांदूळ टाकावा. तांदूळ जास्त शिजवू नये. ७०% शिजू द्यावा. व पाणी निथळून घ्यावे. वेलची व तमालपत्र काढून टाकावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात मुरलेल्या चिकन चे पिसेस पसरवून ठेवावे. चिकनचा प्रत्येक पीस भांड्याला लागायला हवा. त्यावर तळलेले अर्धे कांदे पसरवावे. आता तांदूळ पसरवावे. वरून परत तळलेले कांदे टाकावे. एका वाटीत दुध कोमट करून त्यात केशर टाकून पाच मिनिटे ठेवून हे दुध भातावर टाकावे. एका वाटीत ३ चमचे पाणी घेऊन त्यात रंग कालवून तो भातावर थोड्या थोड्या अंतरावर टाकावा. आता ३ चमचे साजूक तूप सोडावे. गुलाब पाणी सोडावे. पातेल्याच्या कडांना कणकेच्या गोळ्याचे लांब रोल करून चिकटवावे. ह्यावर झाकण ठेऊन तेही कणकेला चिकटवावे. वाफ जायला जागा राहता कामा नये. आता हे पातेले हाय gas वर २ मिनिटे ठेऊन मग एका तव्यावर मंद आचेवर ४५ मिनिटे शिजवावे. gas बंद करून ५ मिनिटांनी झाकण काढून घ्यावे. एका वाटीत जळलेला कोळसा टाकून त्यावर १ चमचा साजूक तूप टाकून पटकन वाटी बिर्यानी वर ठेऊन झाकण घट्ट बंद करावे. ५ मिनिटांनी झाकण उघडावे. दह्याचा रायता करून त्याबरोबर बिर्यानी सर्व्ह करावी.

Comments